Late N.M. Lokhande

भारताच्या कामगार चळवळीचे आद्य प्रवर्तक - कै. नारायण मेघाजी लोखंडे

1. संक्षिप्त पार्श्वभूमी

कै. नारायण मेघाजी लोखंडे यांचे वाडवडील मूळचे पुणे जिल्हयातील खेड तालुक्यातील कन्हेरसर गावचे. जातीने फुलमाळी समाजातील असल्यामुळे फुले-फळे भाजीपाला विकून उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्यांचे वडील ठाण्यात स्थायिक झाले असावेत. त्यामुळे, कै. नारायण मेघाजी लोखंडेंचा जन्म ठाण्यात झाला. त्यांचे मॅट्रीकपर्यंतचे शिक्षण ठाण्यात झाले. त्यानंतर घरच्या परिस्थितीमुळे त्यांना नोकरी करावी लागली. मुंबईसारख्या शहरात नोकरीच्या निमित्ताने ते लालबाग-भायखळा या गिरणगाव परिसरात राहू लागले. बालबोध मासिकाच्या डिसेंबर, 1900 च्या अंकात कै. नारायण मेघाजी लोखंडे यांचे संक्षिप्त चरित्र प्रसिध्द झाले आहे. त्यात दिलेल्या माहितीनुसार फाजलभाई नानशी या खोजा व्यापाऱ्यांशी त्यांचे संबंध चांगले असल्यामुळे प्रथम रेल्वेत आणि नंतर टपाल खात्यात नोकरी मिळाली. पुढे फाजलभाईंच्या शिफारशीमुळे कै. नारायण मेघाजी लोखंडेंना मांडवी मिलमध्ये स्टोअर कीपर म्हणून नोकरी मिळाली. त्यामुळे कै. नारायण मेघाजी लोखंडेनी कामगारांची दयनीय स्थिती केवळ जवळून पाहिली नव्हती तर ती प्रत्यक्षात अनुभवली होती. यातून कामगार चळवळीची मूहुर्तमेढ उभी राहू लागली.

कै. नारायण मेघाजी लोखंडे यांचा जन्म 1848 साली झाला. हे वर्ष अनेक अंगांनी कसे महत्वाचे आहे हे मा. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी त्यांचे स्मरणार्थ तिकिट प्रकाशनाच्या प्रसंगी आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगितले होते. सन 1848 मध्ये कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंजेल यांनी आपला कम्युनिस्ट मॅनिफेस्टो (Communist Manifesto) प्रसिध्द केला, तर त्या वर्षी महात्मा जोतीराव फुले यांनी पुण्यामध्ये भारतातील पहिली मुलींची/स्त्रियांसाठी शाळा सुरु केली आणि हा एक अत्यंत आनंददायी योगायोग आहे. कारण स्वत: कै. नारायण मेघाजी लोखंडे यांनी आपले आयुष्य कार्ल मार्क्स व एंजेल यांचे कामगार वर्गाचे हीत व महात्मा फुलेंच्या स्त्री शिक्षणातून उध्दार या बाबींसाठी खर्ची घातले.

2. बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन- क्रांतीकारक पाऊल

कै. नारायण मेघाजी लोखंडे यांच्या अथक परिश्रम आणि तीव्र इच्छाशक्ती व जिद्दीने ब्रिटीशकालीन भारतामध्ये पहिली कामगार संघटना सन 1884 मध्ये बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन या नावाने स्थापन झाली. तत्कालीन परिस्थितीचा विचार करता अशिक्षीत, अज्ञानी व अप्रगत कामगार कष्टकरी वर्गाला एकत्र करुन त्यांच्यामध्ये हक्काची, कर्तव्याची जाणीव करून देऊन त्याचे रुपांतर एका संघटीत शक्तीत करणे हे एक दिव्य कार्य त्यांच्या सहकाऱ्यांच्या साथीने घडवून आणले. एका व्यापक अर्थाने असंघटीतांना संघटीत करण्याचा हा एक यशस्वी प्रयोग तत्कालीन परिस्थितीत कै. नारायण मेघाजी लोखंडे यांनी केला. पुढे पुढे कामगार शक्ती एकवटू लागली आणि कामगार चळवळ व्यापक होऊ लागली. कामगार चळवळीला एक दिशा मिळत गेली. पुढे विसाव्या शतकात अनेक कामगार संघटना उदयाला आल्या. त्यातून कामगारांचे हितसंबंध जपण्याचा व संवर्धनाचा प्रयत्न होऊ लागला. पण या सर्वांचे मूळ, हे कै. नारायण मेघाजी लोखंडे यांच्या बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन मध्ये दिसून येते. संघटना बांधण्याचे असे हे क्रांतीकारक पाऊल त्याकाळात कै.नारायण मेघाजी लोखंडे यांनी उचलले. हे समग्र कामगार चळवळीच्या दृष्टीने ऐतिहासिक पाऊल होते. त्यामुळे कै.नारायण मेघाजी लोखंडे हे भारताच्या कामगार चळवळीचे आद्य प्रवर्तक, प्रणेते म्हणून संबोधले जातात.

3. कामगार चळवळीतील चैतन्याचा महामेरु

कै.नारायण मेघाजी लोखंडे यांचे कामगार क्षेत्रातील योगदान म्हणजे ज्वलंत ऐतिहासिक कामगार चळवळ होय. त्यावर टाकलेला हा संक्षिप्त दृष्टिक्षेप -

कापड गिरणीमध्ये कै. नारायण मेघाजी लोखंडे स्वत: काम करीत असल्यामुळे तेथील अमानवी स्थितीची चीड त्यांच्या मनात खदखदत होती. याची ठिणगी म्हणजे स्वत: कापड गिरण्यांमध्ये जाऊन कामगारांना संघटीत करुन निर्माण केलेली बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही कामगारांच्या प्रचंड अशा उत्स्फूर्त प्रतिसादातून तयार झालेली देशातील पहिली कामगार संघटना. मुंबई सरकारने 1881 च्या फॅक्टरी ॲक्टमध्ये सुधारणा करण्यासाठी 1884 मध्ये कलेक्टर डब्ल्यु. बी. मुलक यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या कमिशनला कामगारांच्या मागण्या सादर करता याव्यात यासाठी त्यांनी दोन ऐतिहासिक सभा घेतल्या त्याचा उल्लेख याठिकाणी करणे अनिवार्य आहे. पहिली ऐतिहासिक जाहीर सभा कै. नारायण मेघाजी लोखंडेंच्या अध्यक्षतेखाली दिनांक 23 सप्टेंबर, 1884 रोजी सायं. सुपारीबाग, परळ येथे सुमारे 4,000 कामगारांच्या उपस्थितीत पार पडली. लगेच दुसरी जाहीर सभा दिनांक 26 सप्टेंबर, 1884 रोजी भायखळा येथे घेण्यात आली. या सभेलाही कामगारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या दोन्ही सभांमध्ये कामगारांच्या मागण्यांचे ठराव संमत केले. 5,500 कामगारांनी सह्या केलेले मागण्यांचे पिटिशन दिनांक 15 ऑक्टोबर, 1884 रोजी फॅक्टरी कमिशनला सादर केले. त्यामध्ये प्रामुख्याने 5 मागण्या केल्या होत्या - 1) गिरणी कामगारांना आठवडयातून एक दिवस रविवारी सुट्टी देण्यात यावी. 2) दुपारी अर्धातास जेवणाची सुट्टी देण्यात यावी. 3) कामगारांची कामाची वेळ निश्चित करण्यात यावी. 4) कामगारांचा पगार दर महिन्याच्या 15 तारखेपर्यंत देण्यात यावा. 5) कामावर असताना जर कुणाला गंभीर जखम झाली तर तो बरा होईपर्यंत पूर्ण पगार देण्यात यावा. जर कामावर असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला पेन्शन देण्यात यावी. परंतु या मागण्यांबाबत निर्णय लवकर होत नव्हता म्हणून पुन्हा दिनांक 20 नोव्हेंबर, 1889 रोजी साडेसहा हजार कामगारांनी सह्या केलेला अर्ज सरकारला सादर केला. शेवटी तीव्र आंदोलन उभारावे लागले. दिनांक 24 एप्रिल, 1890 रोजी कै. नारायण मेघाजी लोखंडे यांनी महालक्ष्मीच्या रेसकोर्स मैदानावर कामगारांची प्रचंड सभा आयोजित केली. सुमारे 10,000 कामगार या सभेला उपस्थित होते. विशेष म्हणजे दोन कामगार स्त्रियांनी या सभेत भाषणे करुन आपल्या व्यथा समाजापुढे मांडल्या. या घटनेला अनेक बाजूंनी महत्व होते. ही घटना म्हणजे लोखंडेंच्या कामगार चळवळीने समाजजागृतीचा एक टप्पा पूर्ण केल्याचे प्रतिक होते. तसेच, ब्रिटीश सरकार आणि मालक वर्गाच्या विवेकबुध्दीला केलेले ते आवाहन होते आणि विशेष म्हणजे बॉम्बे मिल ओनर्स असोसिएशनने रविवार दिनांक 10 जून, 1890 रोजी कामगारांना दर रविवारी सुट्टी देण्याचा निर्णय जाहीर केला. हे त्या सभेचे फलित होते. यामुळे, भारताला रविवारी साप्ताहिक सुट्टी मिळण्याचे कार्य पूर्ण झाले. समग्र भारतातील कष्टकरी शक्तीच्या एकजुटीने मिळविलेला हा पहिला महत्वपूर्ण विजय होता. हा विजय म्हणजे कामगार चळवळीचा आत्मविश्वास वाढीला लागून कामगार चळवळ अधिक सक्षम होण्यास व तिची व्याप्ती वाढण्यास कारणीभूत ठरला असे म्हटले तर वावगे ठरु नये.

पुढे 1891 साली नवा फॅक्टरी ॲक्ट मंजूर केला व त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी दिनांक 1 जानेवारी, 1892 पासून सुरु झाली. या ॲक्टच्या निर्मितीसाठी कै. नारायण मेघाजी लोखंडे यांनी कमिशनला जे महत्वपूर्ण सहकार्य केले त्याचा विशेष उल्लेख कमिशनने आपल्या अहवालात केलेला आहे. बाल कामगारांच्या वयाची व वेळेची मर्यादा, शिक्षणाची संधी तसेच स्त्रियांच्या वेळेची मर्यादा या नव्या तरतुदी कै. नारायण मेघाजी लोखंडे यांच्या सत्यशोधकी आग्रहातून निर्माण झाल्या होत्या. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन मे, 2005 मध्ये भारत सरकारच्या पोस्ट खात्याने यांची कै. नारायण मेघाजी लोखंडे यांच्या वरील टपाल तिकिटाचे प्रकाशन केले. हा प्रकाशन सोहळा तत्कालीन मा. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी मा. पंतप्रधानांनी काढलेले गौरवोद्गार पुढीलप्रमाणे :-

"भारताच्या कामगार चळवळीचे पितामह कै. नारायण मेघाजी लोखंडे हे केवळ कामगारांचे नेते नव्हते तर गोर-गरीब कष्टकरी महिला यांचे जीवन समृध्द करण्यासाठी तसेच हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी कार्य करणारे समाजसुधारकही होते."

4. समाजातल्या सर्वंकष बदलासाठी झटणारे निर्भीड पत्रकार

बहुजन समाजाच्या हितासाठी, ब्राम्हणेतरांचे पहिले वृत्तपत्र कृष्णराव भालेकर यांनी दिनांक 1 जाने, 1877 मध्ये 'दीनबंधु' या नावाने पुण्यामध्ये सुरु केले. अनेक अडचणींचा मुकाबला करत सातत्याने 3 वर्ष हे वृत्तपत्र भालेकरांनी मोठया जिद्दीने चालविले. परंतु जेव्हा सर्व बाजूंनी नाईलाज झाला तेव्हा भालेकरांना दीनबंधु वृत्तपत्राची जबाबदारी सोडावी लागली. 'दीनबंधु' चालू ठेवणे सर्वांनाच आवश्यक वाटत होते. म्हणून, कै. नारायण मेघाजी लोखंडे आणि कै. रामजी संतुजी आवटे यांनी 'दीनबंधु' मुंबईस आणला. मुंबईत दोघांनी भागीदारीत हे वृत्तपत्र सुरु केले. संपादनाची मुख्य जबाबदारी कै. नारायण मेघाजी लोखंडे यांच्याकडे होती. दिनांक 9 मे, 1880 रोजी मुंबईहून 'दीनबंधु' चा पहिला अंक प्रसिध्द झाला. 'दीनबंधु' च्या मुखपृष्ठावर 'Journal devoted to the interest of working class' असे छापलेले असे. यावरुन 'दीनबंधु' हे कष्टकरी वर्गाच्या हिताचे वृत्तपत्र असल्याचे स्पष्ट होते. कै. नारायण मेघाजी लोखंडे यांचे संपादकीय लिखाण हे अतिशय प्रभावी आणि रांगडया मराठीत असे. एखादया मुद्यावर आपली मते मांडतांना अतिशय रोखठोक आणि निर्भीडपणे प्रतिपक्षाच्या एकेक मुद्याचा धुव्वा उडवावा असे बोलीभाषेसारखे त्यांचे लिखाण असे. त्यांचे लिखाण वाचताना ते स्वत: आपल्यासमोर उभे राहून आपले दु:ख मांडत असल्याचे चित्र उभे करायचे. प्रमाणभाषेपलीकडे जाऊन बहुजनांच्या प्रचलित बोलीभाषेचा वापर कै. नारायण मेघाजी लोखंडे 'दीनबंधु' मधून करीत आणि त्यामुळे ते अज्ञानी बहुजन समाजाचे प्रतिनिधीत्व समर्थपणे करतात याची जाणीव होत असे.

सामाजिक विषयावरील लिखाणाला 'दीनबंधु' मध्ये अग्रस्थान असे. सुरुवातीच्या अंकातून शुद्रातिशुद्रांसाठी मोफत आणि सार्वत्रिक शिक्षणाची मोहीम राबविली जावी यासंबंधी पाठपुरावा केलेला आढळतो. "देशाचे भवितव्य" हे कष्टकऱ्यांच्या श्रमावर, उत्पादकतेवर अवलंबून असल्यामुळे सरकारने त्यांच्या शिक्षणासाठी वाहून घ्यायला हवे अशा आशयाचे लिखाण तत्कालीन परिस्थितीत करुन तसे सरकारला करावयास भाग पाडणारे निर्भिड पत्रकार हा एक अत्यंत महत्वाचा पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वाचा दिसून येतो.

शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये शुद्रातिशुद्रांसाठी विशेष संधी देण्यात यावी, राखीव जागा ठेवाव्यात यासाठी 'दीनबंधु' च्या माध्यमातून कै. नारायण मेघाजी लोखंडे यांनी सातत्याने आग्रह धरल्याचे दिसून येते. यातून कै.नारायण मेघाजी लोखंडेच्या विशाल दूरदृष्टीचा प्रत्यय आज प्रत्येकाला आल्याशिवाय राहणार नाही.

सामाजिक आणि आर्थिक विषमता कमी करुन समाजामध्ये समता प्रस्थापित करावयाची असेल तर या बाबींशिवाय पर्याय नाही, हे कै. नारायण मेघाजी लोखंडे यांनी सव्वाशे वर्षापूर्वी ओळखले होते. आज या अनुषंगाने ज्या काही सुधारणा होत आहेत. त्या पाठीमागे कै. नारायण मेघाजी लोखंडे सारख्या समाजसुधारक विचारवंताचे योगदान आहे हे अधोरेखित होते.

एकूण 'दीनबंधु' हे ब्राम्हणेतरांचे, कष्टकऱ्यांचे केवळ वृत्तपत्र नव्हते तर ती त्यांची चळवळ बनली होती. कै. नारायण मेघाजी लोखंडेनी आपल्या निर्भीड पत्रकारितेच्या जोरावर 'दीनबंधु' ला समाजातल्या सर्वंकष बदलाचे माध्यम बनवले व चळवळीची ताकद वाढवली.

5. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील सत्यशोधक कै. नारायण मेघाजी लोखंडे

तत्कालिन परिस्थितीत प्रवाहाविरुध्द भूमिका घेण्याचे सामर्थ्य ज्या काही मोजक्या समाजधुरिणांमध्ये होते. त्यापैकी एक म्हणजे कै. नारायण मेघाजी लोखंडे होय. महात्मा फुले हे एक तत्त्वचिंतक-समाजसुधारक होते. सत्यशोधक समाजाची निर्मिती करुन त्यांनी शुद्रातिशुद्रांच्या उत्कर्षाचे नवे तत्त्वज्ञान मांडले. कै. नारायण मेघाजी लोखंडेनी त्या तत्त्वज्ञानावर आधारीत कष्टकऱ्यांची चळवळ उभारली. एक निष्ठावंत सहकारी म्हणून लोखंडे फुलेंच्या चळवळीत आघाडीवर असलेले दिसतात. जोतीरावांच्या महत्कार्याबद्दल त्यांना महात्मा पदवी देण्याचा कार्यक्रम कै. नारायण मेघाजी लोखंडेनी आखला आणि जोतीरावांच्या मृत्यूसमयी त्यांच्या जवळ असणारे ज्येष्ठ सहकारी म्हणून कै. नारायण मेघाजी लोखंडे होते.

1893 साली मुंबईत उसळलेल्या हिंदू-मुस्लिमांच्या भीषण जातीय दंगलीच्या प्रसंगी कै. नारायण मेघाजी लोखंडे यांनी केलेले कार्य अत्यंत महत्वपूर्ण आणि आदर्शवत आहे. धर्माच्या नावावर कष्टकऱ्यांमध्ये, समाजामध्ये फूट पडू नये म्हणून त्यांनी मोहल्या-मोहल्यात फिरुन, रिलीफ फंड काढून दंगलग्रस्तांना सहाय्य करुन समाज निर्भय बनावा,जातीय सलोखा निर्माण व्हावा म्हणून राणीच्या बागेत एकात्मता मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात 60,000 मुंबईकर सहभागी होते. या त्यांच्या कर्तृत्वासाठी ब्रिटीश सरकारने "जस्टिस ऑफ पीस" पुरस्कार आणि "रावबहाद्दूर" ही सनद बहाल करुन त्यांचा सन्मान केला.

रावबहाद्दूर ही सनद मिळालेले कै. नारायण मेघाजी लोखंडे हे पहिले पत्रकार होय. समाजामध्ये एकजूट प्रस्थापित व्हावी म्हणून ते नेहमी दक्ष असत. लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी बहुजन हिताची भूमिका घेतल्याबद्यल कै.नारायण मेघाजी लोखंडे यांनी त्यांचा मानपत्र देऊन जाहीर सन्मान करण्यात पुढाकार घेतला. तसेच सामाजिक सुधारणेच्या भूमिकेतून कै. नारायण मेघाजी लोखंडे यांनी 'पंचदर्पण' हे छोटेखानी पुस्तक लिहिले. यामध्ये समाजस्वास्थ्य आणि नैतिकता या दृष्टीने मांडलेले विचार हे मार्गदर्शक आणि आदर्श असे आहेत. त्यांनी सांगितलेले नऊ नियम 1) स्त्री शिक्षण 2) लग्नाचे वय 3) पुनर्विवाह 4) विधवा विवाह 5) लग्नातली उधळपट्टी 6) व्यसने 7) घटस्फोट 8) सहकार 9) बचत, यासबंधीचे विचार आजच्या घडीला देखील सर्वांना मार्गदर्शक असे आहेत. महात्मा फुलेंनी जाणीवपूर्वक वापरलेला 'शुद्रातिशुद्र' हा शब्द आणि लोखंडेनी वापरलेला 'मराठा' हा शब्द म्हणजे ब्राम्हणेतरांच्या व्यापक एकजुटीची संज्ञा होय. कै. नारायण मेघाजी लोखंडेंनी मराठा ऐक्येच्छु सभा, मराठा प्रॉव्हीडंट फंड, मराठा हॉस्पिटल या संस्थांची स्थापना करुन व्यापक समाजकार्य करण्याचा निर्धार केला होता. कै. नारायण मेघाजी लोखंडे यांनी 'दीनबंधू' मधून मराठा म्हणजे महाराष्ट्रातील सर्व ब्राम्हणेतर मराठा ऐक्येच्छु सभा स्थापन केली.

1896 च्या अखेरीस मुंबई परिसरात प्लेगच्या साथीने भीषण रुप धारण केले होते. माणसे मोठया प्रमाणात मृत्युमुखी पडू लागली. गोर-गरीब कष्टकऱ्यांना औषधोपचार मिळावेत यासाठी कै. नारायण मेघाजी लोखंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भायखळा येथे मराठा हॉस्पिटलची स्थापना केली. रोगग्रस्तांना मदत करण्यात लोखंडे अतिशय व्यस्त होते. पण या गोरगरीब कष्टकऱ्यांची देखभाल करता-करता खुद्द कै. नारायण मेघाजी लोखंडेंना प्लेगची लागण झाली याची त्यांना कल्पना आली नाही आणि मंगळवार दिनांक 9 फेब्रुवारी, 1897 रोजी पुणे येथे त्यांचे आकस्मिक निधन झाले आणि संपूर्ण कष्टकरी कामगार चळवळ, सामाजिक चळवळीवर शोककळा पसरली.

6. उपसंहार

एकूण कै.नारायण मेघाजी लोखंडे यांनी आपले संपूर्ण आयुष्य उपेक्षित, गोर-गरीब कष्टकरी कामगार बहुजन समाजाच्या हितासाठी वेचले. त्यांचा लढा, त्यांची चळवळ ही विषमतेविरुध्द आणि शोषणमुक्त समाजासाठी होती. आज कष्टकरी कामगारांच्या आयुष्यात ज्या काही कमी अधिक प्रमाणात सोई-सुविधा दिसून येतात. त्यापाठीमागे कै. नारायण मेघाजी लोखंडे यांच्या त्यागाचा आणि कर्तृत्वाचा इतिहास आहे. तेव्हा त्यांचा लढा हा समग्र सामाजिक परिवर्तनाचा लढा होता. त्यांच्या आदर्शवत कार्याचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याचा दृष्टिकोन सध्याच्या कामगार चळवळीतील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अधिक व्यापक प्रमाणात आत्मसात करुन कामगार चळवळ अधिक सक्षम (Empowerment of the Labour Movement) करण्याची काळाची गरज आहे. गोर-गरीब कष्टकरी वर्गाच्या कल्याणासाठी कामगार चळवळीचा वापर झाला पाहिजे. देशाच्या सर्वसमावेशक विकासाच्या (Inclusive Growth) संकल्पनेत हे अपेक्षित असून, त्यादृष्टीने सर्वांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे. कै. नारायण मेघाजी लोखंडे यांना अभिप्रेत असलेले नवसमाज घडविण्याचे अधूरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे हीच खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली ठरेल. कै. नारायण मेघाजी लोखंडे यांचे नांव कामगार कायद्यांचे प्रशिक्षण देणाऱ्या महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेला देऊन शासनाने त्यांचा यथोचित गौरव केला आहे.